निलम जीवन सकपाळ

नाट्य प्रशिक्षक, ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल,

मराठी माजी विद्यार्थी (२००१-२००६)

         ‘रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय’ आणि त्यातला ‘मराठी विभाग’ ह्या माझ्या आयुष्यातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शालेय शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ह्या महाविद्यालयाने खूप चांगल्या पद्धतीने घडवले आहे. इथे येऊन माझी इंग्रजी भाषा केवळ सुधारली असे नाही तर मी छान इंग्रजी बोलू लागले. इथले प्राध्यापक विद्यार्थ्यांशी ज्या पद्धतीने जुळवून घेतात ते बाकी कुठे घडत असेल असे वाटत नाही. महाविद्यालयीन पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा भरत असतात. तेव्हा प्राध्यापकांचा भर असतो की आपल्या विद्यार्थ्याने ह्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा व आपल्यातील सुप्त गुणांचा शोध घ्यावा. महाविद्यालयामध्ये असताना लक्षात आले की इथे अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. स्पोर्ट्स, आर्ट्स, ते विज्ञान अशा सर्व शाखा अनेक प्रकारे सक्रीय आहेत. आणि ‘परीक्षेसाठीचा अभ्यास’ ह्या संकल्पनेपलीकडे जाऊन प्राध्यापक विद्यार्थ्यांना विषय  पटवून देत असतात  आणि अर्थात विद्यार्थ्यांना आपले करियर निवडण्यासाठी ह्याचा खूपच फायदा होतो.

   ‘मराठी वाड्मय मंडळा’ने तर मला एका नवीन जगाची ओळख करून दिली. साहित्याशी निगडीत अनेक उपक्रमांशी मी नकळत जोडले गेले. आणि माझ्या विचारांची बैठक पक्की झाली. आणि करियरच्या वाटासुद्धा सापडल्या. काही कारणांनिमित्त जेव्हा इतर शाखेच्या प्राध्यापकांशी संपर्क यायचा तेव्हा त्यांचेही पुरेपूर सहकार्य लाभले. कधीच निराशा झाली नाही. अशाप्रकारे ह्या महाविद्यालयानचा मला घडवण्यात मोलाचा वाटा आहे. एकूणच महाविद्यालयाचे उद्दिष्ट हे संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या विकासावरच केंद्रित असल्यामुळे इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी काही ना काही शिदोरी घेऊनच बाहेर पडतो.

Skip to content